रशियाला जे जमलं नाही, ते आपण करुन दाखवलय. भारताच्या चांद्रयान-3 ने यशस्वी सॉफ्ट लँडिग केलं. भारताच्या चांद्र मोहिमेकडे जगाच लक्ष लागलं होतं.
भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी… इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे.
भारताच्या चांद्रयान-3 चं चंद्रावर यशस्वी लँडिंग
भारताच्या चांद्रयान-3 (Chandrayaan-3) नं यशस्वी लँडिंग केलं आहे. भारताच्या चांद्रयाननं इतिहास रचला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला आहे. यासोबतच भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. भारताची शान चांद्रयान-3 चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी ठरलं आहे. 14 जुलै रोजी पृथ्वीवरुन चंद्राच्या दिशेने निघालेल्या चांद्रयान-3 चा चंद्रापर्यंतचा प्रवास यशस्वी झाला आहे. प्रत्येक भारतीयासाठी हा अतिशय अभिमानाचा क्षण आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुव्रावर पोहोचणारा
भारत पहिला देश भारताचं चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यशस्वी ठरलं आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव कायम अंधारात असतो. येथील वातावरण अतिशय थंड असते. भारताच्या चांद्रयान-1 ने चंद्रावर बर्फाचा शोध लावला होता. त्यानंतर आता तेथे पाण्याचे साठे शोधणे हे चांद्रयान-3 चं प्रमुख उद्दीष्ट आहे. चंद्रावरील विविध नमुने गोळा करुन त्यावर इस्रोकडून संशोधन करण्यात येणार आहे.
चांद्रयान-3 चंद्रावर जाऊन काय करणार?
• चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मातीचा अभ्यास करणार
• पृथ्वी, सूर्यमाला, चंद्राच्या निर्मितीची अनेक रहस्ये शोधणार
• चंद्रावर सिलिकॉन लोह, टायटेनियमसारखी दुर्मीळ खनिजं शोधणार
• अब्जावधी वर्ष अंधार, प्रचंड थंडीतल्या मातीत बर्फाचे रेणू शोधणार
• बर्फ, पाण्याचा अंश सापडल्यास भविष्यातील मोहिमांना फायदा
• पाणी असल्यास चंद्रावर ऑक्सिजन, हायड्रोजनची निर्मिती शक्य
• ऑक्सिजन निर्मितीनंतर चंद्रावर मानवी वस्तीचं स्वप्न दृष्टिपथात
अमेरिका, रशिया आणि चीन यांच्यानंतर चंद्राच्या भूमीवर उतरणारा भारत हा जगातील चौथा देश ठरले. चंद्राच्या भूमीवर अवघड अशी सॉफ्ट लँडिंग करण्याचे कौशल्य मिळवणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. चांद्रयान-२ मोहिमेत इस्रोला सॉफ्ट लँडिंगमध्ये अपयश आले होते. तेव्हा ७ सप्टेंबर २०२९ रोजी विक्रम लँडर सॉफ्ट लँडिंगच्या वेळी ब्रेकिंग प्रणालीत झालेल्या गडबडीमुळे चंद्राच्या भूमीवर क्रॅश झाले होते. इस्रोने २००८ साली चांद्रयान-१ मोहिम सुरु केली होती. गेल्या १५ वर्षातील भारताची ही तिसरी चंद्र मोहिम आहे.
मोहिमेची उद्दिष्टे
चंद्राच्या भूमीवर सुरक्षित आणि अलगद यान उतरवण्याचा प्रयोग यशस्वी करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट्ये आहे. तसेच चंद्राच्या भूमीवर यशस्वीरित्या वाहन चालवणे आणि चंद्राच्या गुणधर्मांचा अभ्यास करण्यासाठी शास्त्रीय प्रयोग करणे ही यामागची उद्दिष्ट्ये आहेत.